Hashtagintro

Beed Crime| केजमध्ये 'माझ्याशी लग्न कर!' म्हणत चारचाकी रस्त्याच्या आडवी लावून तरूणीचा विनयभंग

केज : लग्न ठरलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीला मागील महिनाभरापासून एक तरुण सतत फोन करून त्रास देत होता. “माझ्याशीच लग्न कर,” असा तगादा लावून त्याने आपल्या साथीदारांसोबत मिळून त्या तरुणीचा आणि तिच्या भावाचा पाठलाग केला. रस्त्यात चारचाकी गाडी आडवी घालून दोघा बहीण-भावाला उसाच्या वाड्याने बेदम मारहाण करत तरुणीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना केज तालुक्यात घडली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात तिघा जणांविरोधात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूरघाटजवळील म्हसोबा मंदिराजवळ ही घटना घडली. पीडित तरुणी ही कला शाखेच्या प्रथम वर्षात शिकते. ती २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० च्या सुमारास तिच्या भावासोबत उसाच्या फडातून बैलगाडीत जनावरांसाठी उसाचे वाडे घेऊन जात होती.

दरम्यान, वाटेत एका स्कॉर्पिओ गाडीने त्यांची वाट अडवली. तरुणीच्या भावाने गाडी बाजूला घेण्यास सांगितले असता संशयित आरोपी स्वप्निल छत्रभुज आंधळे याने थेट गाडीतून उतरत तरुणीजवळ जाऊन तिचा विनयभंग केला. यावेळी त्याने, ‘आपण पळून जाऊन लग्न करू, तू माझ्याशी लग्न करणार आहेस का नाही?’ असे म्हणत तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला.

बहीण-भावाला बेदम मारहाण

या प्रकाराला विरोध केल्यावर स्वप्निल छत्रभुज आंधळे, गोट्या छत्रभुज आंधळे आणि गोपाळ बाजीराव आंधळे या तिन्ही आरोपींनी मिळून त्या तरुणीला आणि तिच्या भावाला बैलगाडीतील उसाच्या वाड्याने मारहाण केली. या हल्ल्यात बहीण-भाऊ दोघेही जखमी झाले आहेत.

एक महिन्यापासून सुरू होता मनस्ताप

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे नुकतेच लग्न जमले आहे. मात्र, तिचे लग्न ठरल्याचे समजल्यापासून मागील सुमारे एक महिन्यापासून मुख्य आरोपी स्वप्निल आंधळे हा तिला सातत्याने फोन करून मानसिक त्रास देत होता, असेही तपासात समोर आले आहे. घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने तात्काळ केज पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली. तिच्या फिर्यादीवरून स्वप्निल छत्रभुज आंधळे, गोट्या छत्रभुज आंधळे आणि गोपाळ बाजीराव आंधळे या तिघांविरोधात विनयभंग, मारहाण, दमदाटी आणि इतर कायदेशीर कलमांन्वये (गु. र. नं. ६७३/२०२३, भा. न्या. सं. ७४, ११५(२), ११८, १२६(२), ३५१(२), ३५२, ३(५) नुसार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language